Thursday, April 24, 2014


          आयुष्यात आपण शाळेत ,कॉलेज मध्ये वाचलेल्या चार पुस्तकांच्या जोरावर बर्‍या पगाराची नोकरी मिळवतो अन कुठल्याश्या एखाद्या शहरात जाऊन पांढरपेश्या लोकांचं आयुष्य जगू लागतो . मग त्यानंतर खर्‍या कष्टाचा आपल्याला विसर पडतो. एसी रूममध्ये खुर्चीवर बसून केलेल्या कामाला आपण अतोनात कष्ट असं नाव देतो. अन आठवड्याच्या शेवटी या तथाकथित कष्टाचा वजावटा काढण्यासाठी आपण काय काय करतो.,,तर  मॉल मध्ये फिरतो,चित्रपट पाहतो,मद्यपान करतो,झोपा काढतो ,पार्टी करतो.... या ना त्या नाना तर्‍हा असतात आपल्या.. ( मी आपल्या यासाठी म्हणतोय कारण मी हे जनरल मध्ये बोलतोय॰).........अन या गोष्टीची आपल्याला सवय होत जाते जशा काही या गोष्टी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनत चालल्यात ....

         पण काही लोकांच्या भेटीने किंवा काही प्रसंगाने आपल्याला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा विचार करावा लागतो...तर प्रसंग असा की ,,,महिन्याभराणे एखाद्या सुट्टीत गावी जाणे होतं...घरी गेल्यावर मी पण तथाकथित कष्टाचा उगाचच बाऊ करत सहानुभूती मिळवत घरच्यांकडून अन इतरांकडुन मस्त खातीरदारी करून घेत 2 दिवस काढले ..अन असच एका सकाळी लवकर उठलो (चुकून )...घराबाहेर अंगणात आलो ...उजाडायच होतं अजून ..वाटलं सगळे अजून साखर झोपेत असतील ...पण बाहेर लगबग चालू होती ,,,मग म्हंटलं शेजारच्याच एका काकाची दिनचर्या बघू ...माझ निरीक्षण म्हणजे काकाची दैनंदिन दिनचर्या अशी होती ..

        भल्या पहाटे उठून प्रात:विधी आटपुन त्याने हातात विळा घेतला सायकल घेतली अन तो निघाला बाहेर जनावरांच्या चार्‍याची सोय करण्यासाठी.. तासभराणे तो भलमोठे चार्‍याच ओझं घेऊन परत आला त्याच ते कष्ट पाहून ...मला वाटले आता पुढचे 5-6 तास काय तो कुठल्या कामाला हात नाही लावणार ..पण माझं म्हणनं खोट ठरलं...घरी येऊन 4 घास खाऊन तासभरणे तो शेतीची अवजारे घेऊन परत बाहेर पडला. त्याचं शेत आमच्या शेजारीच असल्याने उत्सुकता म्हणून मी भरमसाठ नाष्टा करून, सोबत खायला प्यायला घेऊन ,टोपी, डोळ्यावर गॉगल घालून उन्हाचा कसलाही त्रास होऊ नये म्हणून शक्य तितकी खबरदारी घेतली अन मोटर सायकल वरुन त्याच्या मागे निघालो ,,,अन जाता जाता त्याला लिफ्टची ऑफर ही दिली ..अन चक्क त्याने ती हसत हसत नाकारली ,,,त्याच्या हसण्याच गूढ काही मला त्यावेळी उलगडल नाही ,,असो.. शेतात जाऊन मी एका झाडाखाली माझं बस्तान बसवल अन निरीक्षण करू लागलो..मी मोटर सायकल ने येऊन पण तो माझ्यालागोलगच त्याच्या शेतात पोहोचला ..मी बघत होतो... माझ्याकडे बघून पुन्हा एकदा हसला( परत एकदा मी संभ्रमात )....अन कामाला लागला बहुतेक शेतात तण(अनावश्यक,उपयोग नसलेली वनस्पति )  काढण्याच काम तो करत होता....त्याने डोक्याला फक्त एक रुमाल गुंडाळला होता..त्याच काम उन्हातानात चालूच होत ..मला मात्र भरमसाठ केलेल्या नाश्त्यामुळे अन सोबत आणलेल्या खाद्यपदार्थमुळे बसल्या जागीच झोप येऊ लागली ..अन मी झोपलो ..चांगली 4 तासाने मला जाग आली मी एकडं तिकडं पहिलं तर तो तिथच काम करत होता ..ऊन खाली आले होत आता घरी परतायची वेळ आली होती मी घरी जाण्यासाठी सज्ज झालो ..तो पण निघाला पण रिकामा नाही ...त्याने परत जाताना भलमोठे चार्‍याच ओझे डोक्यावर घेतलं अन तो घरी आला लगोलग मी पण ...आता वाटलं संपलं असेल त्याच काम ..पण छे...आता त्याची परत लगबग चालू झाली ...जनावरांच चारा पाणी तो बघू लागला ,,,दूध वगैरे ....सगळं करून आता जेवणाचा टाइम झाला .....मी पण भरमसाठ जेवलो कारण नुसतं शेताच्या बांधावर बसूनही मला एवरेस्ट चढून आल्यासारखा थकवा आला होता ...आता माझ्या डोळ्यात झोप तरंगत होती म्हंटलं आता तोही झोपणार असेल जरा नजर टाकुया ... अन माझे डोक्यात वीज घंटा वाजली,,,,,तो जेवण खान आटपून देवळात भजनाला जात होता ...मी थक्क झालो ,,,एवढ्या कष्टांनंतर पण यांच्यात भक्तीभाव शिल्लक कसा राहतो हे काय मला उमगल नाही.... आता मात्र मी झोपी गेलो ..

  सकाळी उठलो जरा वेळानेच ...रविवार असल्याने अन गावात काही तरी कार्यक्रम असल्याने गावातली लोक घरीच होती ..शेजारचे काका पण ...मी त्यांच्याकडे गेलो अन न रहाहून त्यांना विचारले काल तुम्ही एवढं काम करून पण संध्याकाळी विश्रांती न घेता भजनाला कस काय गेलात ??? तर ते मला म्हणालेत “ अरं मला काय काम न्हवतं काल,मी फक्त फेरफटका मारायला गेलो होतो शेतात अन बाकीची काम ही रुटीन मधली काम हुतीत त्यान कसलं कष्ट पडतया!!!!”
    मी अवाक झालो ..आपण काल जे काय पाहिल कष्ट नसून रुटीन काम होत,,,,अन शेतातल काम हा फक्त एक फेरफटका होता ...मग यांचं खर कष्ट कसल्या प्रकारच असत ह्याच निरीक्षण नकोच करायला,,,खुर्चीत बसून आळसावलेल्या माझ्या शरीराला ते झेपायच पण नाही म्हणून मी त्यांना साष्टांग प्रणाम करून माझ्या त्याच आयुष्याकडे प्रस्थान केल....

     अन सरतेशेवटी मला आता खर्‍या कष्टाची जाणीव झाली होती ..आता मी माझ्या कामाचा बाऊ करायच सोडून दिलेले आहे आणि आपण करतो ते कष्ट नसून निव्वळ टाइम पास आहे असा साक्षात्कार मला झाला ...